जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नियोजीत कामांबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना जिल्हाधिकारी मार्फत मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर (एमपीजे) च्या वतीने निवेदन देण्यात आले. ५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयनुसार "सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र -२०१९" ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे नियोजन केले होते. या अंतर्गत दरवर्षी महाराष्ट्रातील ५ हजार गावे पाणी टंचाईमुक्त करण्याचे ठरविले.
मात्र आजपर्यंत या अभियानअंतर्गत येणारे कामाची समीक्षा झाली नसल्याचा आरोप या निवेदनातून एमपीजे यवतमाळचे जिल्हाध्यक्ष प्रा.सय्यद मोहसीन यांनी केला आहे. तसेच लाभाबाबत सामान्य जनतेपासून तर सामाजिक संस्थेपर्यंत सर्वांनी प्रश्नही उपस्थित केले. या अभियानाच्या पारदर्शकतेबाबत लोकांमध्ये असंतोष असल्याचे त्यांनी म्हटले, त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी या कामाबाबात आढावा घ्यावा, संकेतस्थळावर याची सविस्तर माहिती द्यावी, कामांचे निष्पक्ष व स्वतंत्र सर्वेक्षण करावे या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.